पेशवाई

 महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासात पेशव्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. पेशवाई जरी १८१८ साली समाप्त झाली असली तरीही पेशव्यांच्या विविध निर्णयांचे पडसाद नंतरच्या कालखंडावरही उमटले आहेत. इंग्रजांनी प्रचलित केलेल्या इतिहासात मुघलांनंतर थेट इंग्रजी राजवट सुरू होते. त्यांनी पेशव्यांची प्रदीर्घ कारकीर्द गाळावी हे समजण्यासारखे आहे, परंतु आता आपणही त्याचे राजकीय फायद्याकरिता अंधानुकरण करावे हे अगदीच न पटणारे आहे. सध्याच्या काळात ‘पेशवे’ हे केवळ राजकीय चलनी नाणं झालेलं आहे.

पेशवाई

लेखक- कौस्तुभ कस्तुरे

प्रकाशक- राफ्टर पब्लिकेशन्स

पृष्ठे- ३५६

किंमत-३२५/-

Those that fail to learn from history, are doomed to repeat it

-Sir Winston Leonard Spencer Churchill

    महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासात पेशव्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. पेशवाई जरी १८१८ साली समाप्त झाली असली तरीही पेशव्यांच्या विविध निर्णयांचे पडसाद नंतरच्या कालखंडावरही उमटले आहेत. इंग्रजांनी प्रचलित केलेल्या इतिहासात मुघलांनंतर थेट इंग्रजी राजवट सुरू होते. त्यांनी पेशव्यांची प्रदीर्घ कारकीर्द गाळावी हे समजण्यासारखे आहे, परंतु आता आपणही त्याचे राजकीय फायद्याकरिता अंधानुकरण करावे हे अगदीच न पटणारे आहे. सध्याच्या काळात ‘पेशवे’ हे केवळ राजकीय चलनी नाणं झालेलं आहे. या सगळ्या गदारोळात अस्सल कागदपत्रांच्या आधारे लिहील्या गेलेल्या इतिहासाकडे दुर्लक्ष होतं आणि मागे उरतो केवळ बिनबुडाचा कोलाहल! अशा परिस्थितीत कौस्तुभ कस्तुरे लिखीत ‘पेशवाई- महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान’ पुस्तक अतिशय वाचनीय आहे. 

    इतिहासाची कागदपत्र वाचणं हे प्रत्येक सामान्य माणसास शक्य असेल असे नाही. शिवाय इतिहासाचा संदर्भग्रंथ वाचून काढणेसुध्दा प्रत्येकालाच आवडेल असं नाही. त्यामुळे सामान्य माणसालाही वाचनात आनंद मिळेल अशा सोप्या शब्दात आणि अतिशय ओघवत्या भाषेत कौस्तुभने हे पुस्तक लिहीलं आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून पुस्तकाची सुरूवात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया घातला. शिवछत्रपतींच्या प्रेरणेनेच आधी छत्रपती संभाजी महाराज आणि मग छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या विरुध्द मराठे २४-२५ वर्षांचा प्रदीर्घ लढा लढले. मराठ्यांच्या राज्यविस्तारामागे या लढ्याची प्रेरणा मोठी आहे. दिल्ली जिंकण्याची आणि मोगली सत्तेला मरणपंथाला नेण्याची क्षमता आपल्यात असल्याची जाणिव एकूणच मराठ्यांच्यात या काळात उद्भवली. कौस्तुभने प्रत्यक्ष पेशवाई कालखंडाला सुरूवात करण्यापूर्वी एकंदरच मराठी साम्राज्याची बैठक स्पष्ट केली आहे. 

त्यानंतर एक एक पेशव्यांवर स्वतंत्र प्रकरणे दिली आहेत. त्यामुळे प्रत्येक पेशव्यांची कारकीर्द उत्तमरितीने हाताळली गेली आहे. बाळाजी विश्वनाथ यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूला अनेक मातबर सरदार आणल्याने त्यांची गादी बळकट झाली. त्यानंतर मग अर्थातच बाजीरावांची अतिशय वादळी कारकीर्द! नुकतंच कौस्तुभने एकूण बाजीरावांच्या विविध पैलुंचा आढावा घेणारं एक स्वतंत्र ‘शहामतपनाह बाजीराव’ या नावाचं पुस्तक लिहीलं आहे. साधरणतः १७१३ ते १८१८ या काळात भट घराण्यातील आठ पुरूषांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. प्रत्येक पेशव्यांकरिता स्वतंत्र प्रकरण असल्याने प्रत्येकाच्या कार्याचं सखोल आणि ससंदर्भ विवेचन आलेलं आहे. संदर्भ ही या पुस्तकाची अतिशय जमेची बाजू आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्या प्रकरणासाठी वापरलेल्या संदर्भग्रंथांची सूची दिलेली आहे. नुसती ती पाहिली तरी पुस्तकासाठी केलेल्या अभ्यासाचा अवाढव्य आकार लक्षात येतो. या पुस्तकाची अजून एक खासियत म्हणजे, ‘पेशवाई: समज- गैरसमज’ हे प्रकरण. यात पेशवाईबद्दलच्या अनेक गैरसमजांची चर्चा लेखकाने केलेली आहे. यात अगदी बाळाजी विश्वनाथांनी आणलेल्या चौथाईच्या सनदांपासून ते दुसऱ्या बाजीरावांपर्यंतच्या कारकीर्दीतील विविध प्रकरणांचा समावेश यात केलेला आहे. 

    पेशव्यांच्या काळात मराठे उत्तरेत अगदी प्रबळ झाले. ‘पानिपत १७६१’ पुस्तकात त्र्यं.शं. शेजवलकर लिहीतात, “आपले चालू भारत ज्या प्रदेशांचे बनले आहे ते प्रदेश मराठ्यांनी आपल्या खंडणीखाली आणलेले आहेत. याउलट जो प्रदेश आता पाकिस्तानकडे गेला आहे त्यात मराठ्यांचे पाऊल पडले नव्हते, असे दिसून येते. याची जाणीव भाजलेल्या लोकंस आता अकल्पितपणे होताना आढळते. मराठे जेथे गेले तेथील दबलेल्या हिंदूंची मुसलमानांच्या भीतीतून सुटका केली. हे एक प्रकारचे नैतिक पुनरुत्थानच होते.मराठ्यांना सरसकट लुटारू म्हणणाऱ्या बंगाली इतिहासकारांनी लक्षात ठेवण्यासारखी यातली बाब ही की, जेवढा प्रदेश रघुज भोसले आणि भास्कर राम कोल्हटकर यांच्या बारगीरांनी लुटला आज तेवढाच प्रांत स्वतंत्र भारतात आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे, आधुनिक भारतावर मराठ्यांचा जो जबरदस्त प्रभाव आहे तो हा असा. मोरोक्को पासून ते इंडोनेशिया पर्यंत पसरलेल्या इस्लाम बहूल राष्ट्रांच्या रांगेत भारताचा समावेश नाही, ही काही अंशी मराठ्यांच्या प्रदीर्घ लढ्याची फलश्रुतीच आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास पेशव्यांना टाळून होऊच शकत नाही. कौस्तुभ कस्तुरे यांच्या पेशवाई पुस्तकाने आता हा अभ्यास अतिशय सुलभ केला आहे.