लेखक: जयंत विष्णु नारळीकर
प्रकाशक
पृष्ठे
किंमत
नाशिक येथे पार पडलेल्या
२०२१ मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. जयंत
नारळीकर एक शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेतच, परंतु त्यासोबतच मराठी वाचकांना ते विज्ञानकथालेखक म्हणूनही माहित आहेत. या
विख्यात शास्त्रज्ञाची एक कथा म्हणजे हे पुस्तक 'व्हायरस'.
सध्याच्या काळात कोरोनामुळे
व्हायरस हा शब्द माहित नसलेला इसम सापडणं दुर्मिळ आहे. मानवाच्या शरिरात शिरून
काहीतरी बिघाड निर्माण करणारा व्हायरस आपल्याला माहित आहे. त्याबरोबरच कधीकधी
एखाद्याच्या संगणकातून आपल्या संगणकातही हा अनाहूत पाहुणा दाखल होतो, आणि आपल्या संगणकाची कार्यप्रणाली बिघडवून टाकतो. हाच
परिणाम जर देशातील सर्वच संगणकात व्हायला लागला तर किती मोठा हाहाकार उडेल.
सध्याचे आपले सगळे आयुष्य जणु काही ठप्प होऊन जाईल. हाच धागा पकडून नारळीकरांनी
त्याभोवती कथा विणली आहे.
अवकाशाचा वेध घेण्यासाठी
महाकाय दुर्बिणींचं संकुल स्थापन केलं जातं आणि त्याद्वारे एका ताऱ्याचा वेध
घ्यायला सुरूवात केली जाते. त्यानंतर काही काळातच जगाच्या विविध भागात संगणकीय
कार्यप्रणालींमध्ये दोष निर्माण झाल्याचं आढळून यायला लागतं. सुरूवातील स्थानिक
वाटणारी ही समस्या विविध देशांत पसरली असल्याचं समोर यायला काही कालावधी जावा
लागतो. मात्र या समस्येचे मूळ काय असेल याबाबत काही अंदाज लागत नसतो. 'विनायक नारायण जगताप' नावाचा भारतातील एक अवकाशशास्त्रज्ञ देखील या अज्ञात विषाणुचा शोध घेत असताना
काही घटनांमुळे त्याच्या विचारांना एक अशक्यकोटीतली दिशा दिसते. अधिक शोध
घेतल्यावर प्रत्यक्षात काल्पनिक वाटणारी त्याची विचारशृंखला प्रत्यक्षात उतरलेली
त्याला दिसू लागते. 'When you have eliminated the impossible, whatever
remains, however improbable must be the truth.' या शेरलॉक होम्सच्या उक्तीनुसार अखेरीस ती अशक्य वाटणारी शक्यता इतर सर्व
शास्त्रज्ञांनादेखील मान्य करावी लागते. काय असते ही कल्पना? कुठे झालेला असतो या विषाणुचा? उगम मानवाला किती मोठा धोका असतो? आणि तो कसा टळतो? या सगळ्याबाबत या पुस्तकात नारळीकरांनी उत्कृष्ट मांडणी
केली आहे.
एखादी विज्ञानकथा अतिशय
रंजक स्वरूपातही कशी मांडली जाऊ शकते, याचं आदर्श उदाहरण या
पुस्तकाद्वारे देता येतं. विज्ञानाला आवश्यक त्या संकल्पना वापरूनही सामान्य वाचक
त्यापासून दुरावणार नाही याची तारेवरची कसरत नारळीकरांनी लीलया केली आहे. उलट अशा
प्रकारच्या संकल्पनांची पेरणी ही त्या कथेत अतिशय सुंदररित्या उठून दिसते. मात्र
त्यात अधिक न गुंतल्याने कथा कंटाळवाणी होत नाही. व्हायरच्या शोधाचा प्रवास
जगतापसोबत आपलाही नकळतपणे सुरू होतो आणि एखाद्या कोड्यातील विविध तुकडे समोर येऊन
मग अचानक चित्र तयार व्हावं त्याप्रमाणे या रहस्याचे चित्र देखील आपल्यासमोर एका
क्षणाला स्पष्ट होते. अव्वल दर्जाची विज्ञानकथा वाचायची असेल, अथवा विज्ञानकथा वाचनाला सुरूवात करायची असेल तर अवश्य
वाचावे असे पुस्तक.