पुतिन


पुतिन

लेखक- गिरीश कुबेर

प्रकाशक- राजहंस प्रकाशन प्रा. लि.

पृष्ठे- २६५

किंमत- ₹३२५/-

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी दोन गटांत झाली होती. साम्यवादी विचारांचं प्रतिनिधित्व करत असलेला रशिया आणि भांडवलशाही विचारांची प्रतिनिधी अमेरिका! दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अनेकदा या सत्ता एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या, क्वचित तिसऱ्या महायुद्धाचे ढगही जगाच्या आसमंतात गोळा झाले. मात्र पुढे आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे सोविएत संघराज्यांचं विघटन होऊन विविध देश रशियाच्या प्रभावातून मुक्त झाले. खुद्द रशियाला देखील काळाची गरज ओळखून आर्थिक धोरणं बदलावी लागली. सहस्त्रक बदलाच्या उंबरठ्यावर असतानाच नव्या रशियाला अतिशय बेरकी असा अध्यक्ष लाभला- व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन.

सर्वसामान्य भारतीयांसाठी पुतिन यांची ओळख कट्टर दहशतवाद विरोधक अशी असते. त्यांच्या त्या भूमिकेमूळे अनेकदा त्यांची भूरळही पडू शकते. मात्र प्रत्यक्षात हा माणूस कसा आहे. याचा आढाव गिरीश कुबेर यांनी या पुस्तकात घेतला आहे. 

युरोपपासून ते अगदी पूर्वेला प्रशांत महासागरापर्यंत पसरलेल्या अवाढव्य देशाचं सर्वोच्च पद उपभोगणाऱ्या माणसाच्या हातात एकवटलेल्या ताकदीचा अंदाज आपल्याला करणे अवघड आहे. परंतु ते न केल्यास त्या राज्यकर्त्याची चुकीची प्रतिमा आपल्यासमोर निर्माण होऊ शकते. पुतिन यांच्या आधीचे अध्यक्ष येल्त्सिन यांनी रशियाला लोकशाहीच्या आणि आर्थिक दृष्ट्या भांडवलशाहीच्या मार्गावर न्यायचा प्रयत्न केला, मात्र तो फसला. त्यानंतरच्या निर्नायकी काळात पुतिन यांनी देशाची सुत्रं हातात घेतली आणि रशियाचा पुन्हा एकदा पोलादी पडदा बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

गिरीश कुबेर यांनी या पुस्तकामध्ये रशियाच्या राजकीय इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतला आहे. त्यायोगे, मुळात या महाप्रचंड देशाच्या निर्मितीचा आपल्याला थोडक्यात अंदाज येऊ शकेल. १९१७ साली घडून आलेल्या बोल्शेविक क्रांतीने रशियावर सुमारे ३०० हून अधिक वर्ष राज्य करणाऱ्या निकोलाव्ह घराण्याची सत्ता उलथवून टाकली आणि त्याठिकाणी एका वेगळ्याच राजकीय विचारधारेचा प्रयोग केला. जगात सर्वात प्रथम मार्क्सवादी विचारांची राजवट एखाद्या देशावर लागू झाली. 

त्यानंतर लेखकाने रशियातील एकेका अध्यक्षाच्या कारकिर्दीचा धांडोळा थोडक्यात घेतला आहे. त्यातून प्रत्येक राज्यकर्त्याने रशियाला अधिकाधीक पोलादी पडदा कशा प्रकारे बनवत नेले ते आपल्यासमोर येते. त्याबरोबरच रशियाची आर्थिक वाटचाल देखील आपल्याला दिसते.

अखेरी ९० च्या दशकात जेव्हा आर्थिक आणि राजकीय पातळीवर साम्यवादापासून फारकत घेण्याची वेळ येते त्यावेळी त्या देशाने अनुभवलेली निर्नायकी अवस्था देखील आपल्यासमोर मांडली जाते. या अस्थिर काळात बोरिस येल्त्सिन यांची दुबळी ठरत चाललेली राजवट रशियासमोरचे आर्थिक संकट अधिकच गहिरे करत नेते. त्याचे पर्यावसान येल्त्सिन यांची प्रकृती अधिकाधीक क्षीण होत जाऊन अखेरीस पायउतार होण्यात होते.

यानंतरचा काळ रशियासाठी अतिशय क्रुर आणि धूर्त अशा राजकारण्याच्या राजवटीचा आहे. पुतिन यांनी सत्तेत येण्यापूर्वीपासूनच आपले दात दाखवायला सुरूवात केली. लेनिनग्राडमध्ये त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. तिथपासूनच त्यांनी आपण कोण आहोत याची चुणूक दाखवायला घेतली. वरकरणी निर्विकार चेहरा, मोजकं बोलणं यातून अतिशय गंभीर आणि विचारी असल्याची प्रतिमा पुतिन मोठ्या चालाखीने निर्माण करतात. त्याच्याच आधारे सत्तेत आल्यानंतर त्यांनी विरोधकांचा पद्धतशीर काटा काढायला सुरूवात तर केलीच मात्र त्याबरोबरच जागृत नागरिकांना देखील निर्घृण पद्धतीने त्यांनी संपवले. पुतिन यांच्या क्रुरतेचा लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे. 

जगात आजही रशिया एक महत्त्वाचे स्थान राखून आहे, त्याचे कारण म्हणजे पुतिन यांच्यामुळेच पुनरुज्जिवीत झालेले या देशाचे महाप्रचंड लष्कर आणि एकूण लष्करी ताकद, त्याबरोबरच मोठ्या प्रमाणातील तेल उत्पादन! पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशियाशी भारत दोस्ती करत असताना या देशाचा नेता किती बेरकी, क्रुर आणि निर्घृण आहे याची जाणीव आपल्याला असायला हवी. पुतिन यांच्याविषयी उत्तम माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.