पुरंदऱ्यांची दौलत

 बाबासाहेब पुरंदरे हे नाव महाराष्ट्राला काही अपरिचीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहीलेल्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची कित्येकांनी पारायणं केली असतील. इतिहास सनांच्या गणितात न अडकवता, तो वर्तमानाइतका जीवंत करून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कसब सर्वच वाचकांना स्मरत असेल.

पुरंदऱ्यांची दौलत

लेखक: बाबासाहेब पुरंदरे

प्रकाशक: पुरंदरे प्रकाशन

किंमत: १०० रुपये

पृष्ठ: ९६

       बाबासाहेब पुरंदरे हे नाव महाराष्ट्राला काही अपरिचीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहीलेल्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची कित्येकांनी पारायणं केली असतील. इतिहास सनांच्या गणितात न अडकवता, तो वर्तमानाइतका जीवंत करून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कसब सर्वच वाचकांना स्मरत असेल. इतिहासाचा बारकाईने अभ्यास करून पुराव्यांसकट शास्त्रशुद्ध पद्धतीने तो लोकांसमोर आणणाऱ्या बाबासाहेबांनी काटेकोर इतिहास विवेचन थोडे बाजूला सारून कागदपत्रे, बखरी इत्यादींच्या सहाय्याने लालित्यपूर्ण भाषेत लोकांसमोर आणलेली दौलत म्हणजे ही पुरंदऱ्यांची दौलत.

       इतिहासाची आवड अनेकदा गोष्टींमधून लागते. त्यामुळेच गोष्टीरूपाने इतिहास सांगणारे हरितात्या आपल्याला अधिक जवळचे वाटतात. याचसाठी जणूकाही बाबासाहेबांनी देखील बालगोपाळांना आपल्या तेजस्वी इतिहासाची जाणिव करून देण्यासाठी काटेकोर इतिहासाऐवजी, त्याच कागदपत्रांत, बखरींत सापडले तेथे जसेच्या तसे दिलेले संवाद वापरून तर काही ठिकाणी मूळ इतिहासाला धरून असेलेल संवाद घालून हे पुस्तक लिहीले आहे. त्यामुळे या पुस्तकाला पुरंदरे आजोबांच्या कथा असे गोंडस रूप प्राप्त झाले आहे. प्रस्तुत पुस्तकात बाबासाहेबांनी शिवकालाऐवजी पेशवेकाळाची निवड केली आहे. पेशव्यांच्या दरबारातील सरदारांच्या बुद्धीचातुर्याच्या, मेहनतीच्या, आणि पराक्रमाच्या कथा त्यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत.

       इतिहासाची आवड लागण्यासाठी मुलांना सोप्या भाषेत हे प्रसंग त्यांनी सांगितले आहेत. आपल्या पराक्रामाच्या गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या कथा हे अतिशय उत्तम माध्यम आहे. शिवाय आयुष्यभर स्वतःला शाहिर म्हणणवणाऱ्या पुरंदऱ्यांनी कथा लिहीतानाही कागदपत्रांचा आधार अजिबात सोडलेला नसल्याने त्यातून इतिहासही आपल्यापर्यंत पोहोचतो. या छोटेखानी पुस्तकात ९ लहान लहान कथांचा समावेश करण्यात आला आहे. भावी पिढीला इतिहास समजण्यासाठी नक्की उपयोगी ठरेल असे पुस्तक पुरंदऱ्यांची दौलत