लेखक- सेतुमाधवराव पगडी
प्रकाशक- परचुरे प्रकाशन
मंदिर, गिरगाव, मुंबई-४
पृष्ठ- ३२०
किंमत-
इ.स. १९४७ मध्ये स्वतंत्र
होताना भारताची धर्माधारित फाळणी होऊन पाकिस्तान नावाचे वेगळे राष्ट्र निर्माण
झाले. पाकिस्तानच्या विचारकांच्या दाव्यांनुसार भारतात पहिल्या मुसलमानासोबतच
पाकिस्तानची बीजे रोवली गेली. पाकिस्तान निर्मितीच्या पुर्वी अथवा नंतरही, हिंदू- मुस्लिम संबंध कमी- अधिक प्रमाणात तणावपूर्ण राहिले
आहेत. अनेक ठिकाणी सौहार्दपूर्णही राहिले आहेत.
या परिस्थितीत पुस्तक
वाचण्याचे मुख्य कारण म्हणजे, मुसलमान समाजाबद्दल
व्यक्तिगणिक दृष्टीकोन बदलत जातो. त्यामुळे मुसलमान सामाजाबद्दलचं आपलं ज्ञान
कायमच तोकडं अथवा एकांगी राहिलं आहे.नभारतीय मुसलमानांची समस्या समतोलपणे
लिहीण्याचं शिवधनुष्य सेतुमाधवरावांनी पेललं आहे. एकांगी न होता समतोलपणे, मुसलमान समाज, त्यांच्या समस्या
जाणून घ्यायला पुस्तकाची मदत होते. अर्थात वाचन हे व्यक्तिसापेक्ष असल्याने जर हे
लिखाण मान्यच नसेल, तर मात्र अवघड आहे. मुसलमान
समाजातील उदारमतवादी पंथ जसे की सुफी परंपरा व त्यातील काही संत, अकबर, अबुल फजल, दारा शुकोह यांसारख्या मध्ययुगातील व्यक्ति असोत अथवा
आधुनिक काळातील विविध विचारवंत, त्यांच्या लिखाणातून
डोकावणारे मुस्लिम अंतरंग त्यांनी रेखाटले आहे.
काळाचा परिणाम अटळ असतो.
मध्ययुगात अरबस्तानात उगम पावलेल्या इस्लाम धर्मावरही तो झाला. त्यातही वांशिक, भाषिक, पंथीय भेद उद्भवले.
पुराणमतवादाला चिकटून राहू इच्छिणाऱ्याला पंथाला देखील आधुनिक आव्हाने चुकत नाहीत.
त्यामुळे मग त्यांची पुराण काळ आणि आधुनिक आव्हाने यांची सांगड बसवताना ओढाताण
होते. यासगळ्याकडे तटस्थ वृत्तीने, एक धर्म म्हणून
पाहून इस्लाम, त्याचा उगम, प्रवास, इतिहास या सगळ्याचं
साधार लिखाण सेतुमाधवरावांच्या या पुस्तकात सापडतं. एकेकाळी, भौतिकशास्त्र, नौकानयन, भूगोल, खगोल, बीजगणित, भूमिती अशा विविध
क्षेत्रांत आपली छाप सोडणाऱ्या अरबी लोकांचा प्रवास कट्टरतेकडे का, कसा झाला? इस्लाममधील वांशिक
आणि पंथीय झगड्यांचे झालेले परिणाम याबाबत लिखाणाच्या ओघात आपल्याला माहिती मिळते.
स्वतः उर्दू तसेच फारसी
भाषेचे जाणकार असल्याने सेतुमाधवरावांच्या लिखाणाला निराळाच कांगोरा प्राप्त होतो.
या पुस्तकात मुस्लिम स्त्री लेखीकांच्या लेखनातून घडणारे मुसलमान समाजाचे दर्शन
थोडक्यात घडवले आहे. कट्टरतावाद बाजूला सारून, थोडं आत शिरून, ‘मुसलमान’ समाज म्हणून समजून
घ्यायला सेतुमाधवराव पगडी यांच्या पुस्तकाचा उपयोग होतो. समाज म्हणून आपल्या काही
गैरसमजुती दूर व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे, हिंदू मुस्लिम प्रश्नाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी प्राप्त
होते.
पुस्तकाबाबत पुस्तकाच्या मलपृष्ठावरच
अधिक उत्तम पध्दतीने लिहीलेलं आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहील्यानुसार
‘त्यांच्या या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य असे की त्यात इतिहासकारांच्या अधिकृत
लेखनाच्या आधारे मुस्लिम समस्या आणि तत्संबंधित अनेकविध आनुषांगिक व्यक्ती आणि
घटना यांवर सर्वांगीण प्रकाश टाकण्यात आलेला आहे; शिवाय मुस्लिम विद्वान आणि विदुषी यांच्या आत्मकथनांतून
प्रकट झालेला मनोगतांचे मनोज्ञ आणि मार्मिक दर्शन घडविण्यात आलेले आहे.
या ग्रंथाच्या
अनुक्रमणिकेवरूनच त्याची उपयुक्तता लक्षात येते. भारतातील मुसलमानांची सद्यस्थिती, पाकिस्ताननिर्मीतीची पार्श्वभूमी, अलिगड विद्यापीठाच्या प्रेरणा व त्याचे पर्यावसान, एकूण इतिहासासंबंधीच्या भ्रामक कल्पना, ऐतिहासिक मुस्लिम राजवटी, इंग्रजांची ‘फोडा आणि झोडा’ अशी राजनीती, मुस्लिम उदारमतवादी परंपरा, हिंदू आणि मुस्लिम या उभय संस्कृतींतील देवाणघेवाण, परदेशांतील मुस्लिम अल्पसंख्यांकांना मिळणारी वागणूक, भारतात समान नागरी कायदा जारी करण्याची आणि भारतीय
एकात्मतेच्या निर्मितीची निकड अशा धगधगत्या प्रश्नांचा उलगडा या ग्रंथात समतोलपणे
आणि सुलभपणे करण्यात आलेला आहे.’