रारंग ढांग

रारंग ढांग

रारंग ढांग

लेखक- प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक- मौज प्रकाशन

किंमत- ₹१२०/- 

रारंग ढांग ही प्रभाकर पेंढारकरांनी लिहीलेली अप्रतिम कादंबरी आहे. मुंबईतील उच्च पगाराची नोकरी सोडून केवळ आपल्या ध्येयासाठी हिमालयात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसोबत काम करणाऱ्या ध्येयवेड्या तरूणाची- लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे याची ही कथा आहे. कादंबरीमध्ये केवळ घटनाक्रम न देता त्यातील विविध पात्रांचे सुंदर दर्शन पेंढारकर विविध प्रसंगांच्या माध्यमातून करून देतात. त्यामुळे कादंबरी वाचकाला गुंतवून ठेवते.

हिमालयातील भागात सरळसोट कड्यांना ढांग म्हणतात. हा रारंग ढांग. सैन्याच्या हालचालीसाठी या ढांगातून रस्ता बनवण्याचं काम सीमा सडक संघटन करत असतं. त्याच कामासाठी पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेल्या विश्वनाथ मेहेंदळे याची नियुक्ती होते. विश्वनाथ पूर्वी मुंबईतील एका मोठ्या कंपनीसाठी इंजिनियर म्हणूनच काम करत असतो. मात्र तो हे काम सोडून दूर हिमालयातील काम का स्वीकारतो हे खुद्द विश्वनाथने वडिलांना लिहीलेल्या पत्रातून उत्तम रितीने प्रकट झालं आहे. अशाच विविध पत्रांतून विश्वनाथच्या स्वभावाचे मनोज्ञ दर्शन वाचकांना घडते. 

कामावर रूजू झाल्यानंतर त्याची गाठ त्याचे वरिष्ठ मेजर बंबांशी पडते. मेजर बंबा पूर्वापार सैन्याधिकारी राहिले असल्याने त्यांनी खास सैनिकी मनोवृत्ती असते. त्यामुळे त्यांचे 'सिव्हिलियन्स' बद्दल पूर्वग्रह असतात. त्यामुळे सैनिकी खाक्याचे मेजर बंबा आणि स्वतंत्र बुद्धिचा विश्वनाथ यांच्यातील (वि)संवाद देखील वाचकांना खिळवून ठेवतात. या दोन पात्रांमधील संबंध दोघांचेही विविध पैलू अतिशय समर्थपणे उलगडून दाखवतात. ही दोन पात्रं एकामेकांना विरूद्ध जाणारी असल्याने या दोघांमधील संघर्षमय संबंध आणि त्या अनुषंगाने इतरांची मांडणी भावून जाते.

याशिवाय इतक्या दुर्गम भागात सीमा सडक संघटनचे इतरही काही लोक असतात. त्यांची स्वभाववैशिष्ट्ये देखील लेखक ओघवत्या भाषेत आपल्यासमोर मांडतो. या भागातील नैसर्गिक आपदा, विविध प्रसंग यांच्या निमित्ताने पुस्ताकातील एक विचार सातत्याने वाचकासमोर येतो. तो म्हणजे माणसाच्या क्षणभंगूर जीवनाचा केलेला विचार!

विश्वानथ हे यातील मुख्य मात्र असल्याने सहाजिकपणे कथा त्याच्याभोवती फिरते. विश्वनाथची विचार करण्याची पद्धत, त्याची स्वतंत्र बुद्धी, त्याच्या विषयातील त्याचे अफाट ज्ञान यामुळे वाचक म्हणून आपणही मोहून जातो. इंजिनियरींच्या ज्ञानासोबतच विश्वनाथने लिहीलेली पत्रे देखील वाचनीय आहेत. त्यातून त्याची माणूस म्हणून असलेली घडण देखील समोर येते.

पुस्तकाच्या सुरूवातीच्या प्रसंगापासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत विविध ठिकाणी मृत्यू किती जवळ असू शकतो, याची जाणीव विश्वनाथसोबत आपल्याला देखील होत जाते. कादंबरीचा हा अंतःविचार सातत्याने विविध पद्धतीने सहजतेने आपल्यासमोर आल्यामुळे "जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है? एक यादगारी!" हे वाक्य आपल्या मनात घर करून बसतं.