- डॉ. प्रकाश बाबा आमटे
(समकालीन प्रकाशन)
'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटामुळे सर्वमूखी झालेले हे नाव! या चित्रपटामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात हेमलकशाच्या 'लोक बिरादरी प्रकल्पा'ची माहिती बाहेरच्या जगापर्यंत पोहोचली. तशी डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची ओळख अनेकांना त्याच्या आधीपासूनच विविध कारणांमुळे होती. त्यापैकी हे पुस्तक महत्त्वाचे माध्यम ठरले असावे. हेमलकसाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच्या आठवणी यात शब्दबद्ध केलेल्या आहेत. आपल्या कार्याचा प्रेरणास्त्रोत अर्थातच बाबा आमटे, यांच्या सोबतच्या बालपणाच्या आठवणी देखील यात वाचायला मिळतात. आनंदवनातील दिवस, पुढे मग शाळा- कॉलेज यातील शिक्षण, हेमलकसा प्रकल्प, त्या प्रकल्पातील अनेक सहकारी, खर्चाची करावी लागलेली ओढाताण अशा विविध आठवणी, अनुभव काही किस्से या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींचा संघर्षही लेखनात दिसून येतो. त्याबरोबरच त्यांच्या जीवनातील विविध पैलूनही डॉ. आमटे आपल्यासमोर मांडतात. त्या लोकांशी जमवून घेताना, त्यांचा विश्वास संपादन करताना आलेल्या आडचणी व त्यातून शोधलेले मार्ग वाचण्यासारखे आहेत. एकूण हेमलकसा प्रकल्पाचा विस्तार समजून घ्यायला पुस्तकाची मदत होते. आता आमटे कुटुंबियांची दुसरी पिढी या समाजकार्यात उतरली असल्याचा उल्लेख ते अभिमानाने करतात. याशिवाय 'जगन्नाथाचा रथ' प्रकरणात प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या मदत केलेल्या अनेकांचा उल्लेख करतात. पुस्तात शेवटच्या प्रकरणांत आपला वडिलबंधू विकास आमटे यांच्या भक्कम सहाय्यतेचा उल्लेख करतानाच, त्यांच्या कार्याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्याची खंतही ते व्यक्त करतात.
(पुस्तकाचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)