लेखक- दिलीप कुलकर्णी
प्रकाशक- राजहंस प्रकाशन
पृष्ठे- १६३
किंमत- ₹२५०/-
‘हरित हिंदुत्व’ हे पुस्तकाचं नाव चकित करणारं असलं तरिही पुस्तकाचा मूळ गाभा अत्यंत समकालीन आणि आजच्या काळातील आवश्यक विषयाला वाचा फोडणारा आहे. आज केवळ भारतच नाही तर साऱ्या जगासमोरच विनाशकारी पर्यावरण बदलांचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. अशा वेळेस हिंदुत्वविचार पर्यावणाबाबत काय सांगतो? पर्यावणाकडे कशा दृष्टीने पाहतो हे समजून घेण्याकरिता हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे.
या पुस्तकाची विभागणी लेखकाने एकूण ६ विभागांत केली आहे. ‘पर्यावरण- विनाशाची कारणमीमांसा’, ‘हिंदू तत्त्वविचार आणि जीवनदृष्टी’, ‘हिंदू संकल्पना आणि प्रतीकं’, ‘वैज्ञानिक निकषांवर हिंदुत्व’, ‘हिंदुत्वाची हरित धोरणं’ आणि ‘हरित हिंदुत्व: काल-आज-उद्या’ अशा सहा विभागांतून हिंदू धर्मातील पर्यावणपूरक विचार-जीवनशैली लेखक आपल्यापुढे मांडतो.
मूलतः आधुनिक काळातील विकासाची व्याख्या अर्थशास्त्र- केंद्रित असल्याने त्यानुसार होणारी वाटचाल विकासाकडे होत नसून विनाशाकडे होत असल्याचे परखड मत लेखकाने व्यक्त केले आहे. चंगळवादामुळे मोठ्या प्रमाणात संसाधानांचा ऱ्हास होत असल्याचे आता सर्वज्ञात आहे; मात्र त्यानंतर लेखकाने सुचवलेला मार्ग पाश्चात्त्य विचारवंतांपेक्षा वेगळा आहे. पश्चिमेकडे मिनीमालिस्ट अशी संकल्पना आकारास येत असताना या पुस्तकाद्वारे लेखक प्राचीन हिंदू जीवनशैलीकडे आपल्याला घेऊन जातात. परकीय आक्रमणांपूर्वीपासून ते नंतरही हा देश बहुसंख्यांक हिंदूंचाच राहिला. या संपूर्ण इतिहासामध्ये भारताने केलेल्या भौतिक प्रगतीचे पुरावे उपलब्ध असतानाही ही संस्कृती नष्ट का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधताना लेखकाने हिंदू तत्त्वज्ञनाचा अभ्यास केला.
भौतिक विकासापेक्षा अध्यात्मिक विकासाला अधिक दिलेलं महत्त्व व त्याच्याभोवती केलेल्या जीवनशैलीची रचना, हे या संस्कृतीच्या धारणक्षमतेचं रहस्य असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ‘जन विषयांचे कीडे, त्यांची धाव बाह्याकडे’ असं कवी बी त्यांच्या ‘चाफा बोले ना’ या गीतात म्हणतात; परंतु सामान्य जनांच्या या भौतिक आणि इंद्रिय सुखांचाही हिंदू जीवनशैलीने केलेला विचारही लेखकाने आपल्यासमोर या पुस्तकात मांडला आहे. भारतीयंनी बाष्पशक्तीसारख्या यंत्रांचा वापर टाळून केवळ श्रमाधारित जीवनपद्धती स्वीकारली त्यामुळे संसाधनांची धारणक्षमता, पुनर्नविकरणक्षमता कशा तऱ्हेने टिकल्या याचे प्रतिपादन लेखकाने पुस्तकात विविध ठिकाणी केले आहे. त्याबरोबरच त्याची तुलना न्युटनीय/देकार्तीय वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित युरोपीय संस्कृतींशी त्यांनी करून दाखवली आहे. या विचारप्रणालीद्वारे मानवी जीवनातून नैतिकमूल्यांची हकालपट्टी केल्याने (झाल्याने) वसाहतवाद, चंगळवाद इत्यादी पर्यावरणविनाशी विचार कसे फोफावले हे लेखकांनी उलगडून दाखवले आहे. भारतीयांनी मात्र अशा बाह्य तथाकथित प्रगतीऐवजी अंतर्गत आणि चिरकाळ टिकणाऱ्या आनंदप्राप्तीला महत्त्व दिल्याने ही जीवनशैली कालप्रवाहात अनेक सहस्त्रे टिकल्याचे त्यांनी उत्तमरितीने मांडले आहे.
हे या पुस्तकाचे एक अंग! या पुस्तकाद्वारे लेखकाने आधुनिक विज्ञानाच्या विचारावर, अर्थशास्त्रावर टीका केली आहे. मात्र त्यामुळे सामान्य वाचकांच्या मनात अनेक व्यावहारिक शंका उद्भवतातच! लेखकाने पुस्तकाद्वारे मांडलेली जीवनशैनी प्राचीन काळातील भारतीय जीवनशैलीची आठवण करून देणारी आहे. मात्र आधुनिक काळात १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला ही जीवनशैली खरोखर शक्य आहे का? हा विचार व्हायला हवा. देशाच्या विकासासाठी अर्थशास्त्रीय मोजपट्ट्या जर नाही लावायच्या तर अन्य कोणत्या मोजपट्टीवर देशाचा विकास मोजावा? ‘चिरंतन टिकणारा आध्यात्मिक आनंद’ ही संकल्पना सुंदर वाटली तरी बहुसंख्य जनतेला आत्ताच्या काळात ती स्वीकारणे खरोखर शक्य आहे का? मूळात भारतीय संस्कृतीचे बरेच उपलब्ध अवशेष हे नागरसंस्कृतीचे असताना, नंतरच्या प्राचीन भारताच्या इतिहासातही विविध नगरांचे प्रामुख्याने येत असताना विद्यमान नगरांनाच दोषी धरणे योग्य आहे का? असा प्रश्न मनात नक्की उपस्थित होतो. या पुस्तकातील वैद्यकीयक्षेत्राविषयीचे लिखास संपूर्णपणे न पटणारे असेच आहे. ‘चंगळवाद’ हे लंबकाचे एक टोक असेल तर काही ठिकाणी लेखकाने हा लंबक दुसऱ्या टोकाला नेल्याची शंका वाचकाच्या मनात निर्माण होते. निदान तशी शंका घेण्याइतका वाव त्यांच्या लेखनातून मिळतो.
आधुनिक विज्ञानाला चूक ठरवताना त्याच विज्ञानाच्या आधारावर सुखकर झालेल्या जीवनाकडे लेखकाने दुर्लक्ष केलेले जाणवते. आधुनिक विज्ञान नाकारून पुन्हा उलट दिशेने प्रवास करण्याची अव्यावहारिकता सामान्य वाचक नक्कीच जाणतो. त्यामुळेच वैयक्तिकरित्या असं वाटतं की लेखकाने सुचवलेला मार्ग हा व्यक्तिगत मार्ग असू शकतो, संपूर्ण देशाला त्यावरून चालायला सुचवणे देशासाठी घातक ठरेल.
निःसंशयरित्या पुस्तकाची उपयुक्तता ही इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहेच. ज्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा आपण अभिमान बाळगतो तिच्या धारणीयतेविषयची तिच्या या अत्यंत समकालीन पैलूविषयीचा अभिमान दुणावतो. मात्र अनेक ठिकाणी आधुनिक काळातील व्यावहारिकतेला पुस्तक छेद देते. किंबहुना मनुष्याच्या संपूर्ण विकासप्रक्रियेवरही शंका उपस्थित करते, त्यामुळेच वाचकाच्या शहाणीवेपासून काही प्रमाणात दुरावते. विकासप्रक्रियेतील किती निर्णय जाणिवेच्या पातळीवरून घेतले गेले आणि किती निसर्गतः निर्माण झालेल्या प्रवाहाचा भाग बनले यावर त्यांचे योग्य मूल्यमापन झाले असे वाटत नाही. उदा. भारतीयांना बाष्पशक्तीचा शोधच लागला नाही म्हणून त्यांनी वापरली नाही, की शोध लागूनही या यंत्रामुळे पर्यावरणाचा विनाश होईल अशा एखाद्या दूरदृष्टीमुळे ती शक्ती वापरली नाही, याबाबत ठोस पुरावा उपलब्ध आहे का? अशा काही मात्र महत्त्वपूर्ण उणिवांमुळे पुस्तक अत्यंत वाचनीय, वंदनीय ठरते- आचरणीय ठरू शकत नाही.