जाणाऱ्या देवांची कहाणी

तीनशे वर्षं जुनी नरहरीची मूर्ती वडिलोपार्जित घरातून हलवून दुसरीकडे नेणाऱ्या कुटुंबियांची ही कथा आहे. माणूस आणि देवाच्या नात्याचे वेगळे पैलू उलगडवून दाखवणारी कादंबरी आहे. कुलवदेवता एका वास्तुतून दुसरीकडे हलवली जाते, तेव्हा माणसे ज्या उत्कटपणे वागतात, त्यांची ही कथा आहे.

जाणाऱ्या देवांची कहाणी

लेखक- दि. बा. मोकाशी

प्रकाशक- मौज प्रकाशन

पृष्ठे- ६५

किंमत- रू. १२५


खरं म्हणजे केवळ सुंदर आणि तरल या दोनच शब्दात या धीट लघुकादंबरीचं वर्णन केलं जाऊ शकतं. पुस्तकाचं शीर्षक वाचून मला कळेना की पुस्तक कशाबाबत आहे ते! वस्तुतः केवळ ६५ पृष्ठांचं पुस्तक, त्यामुळे एका दिवसात काय- अर्ध्या दिवसात सहज संपेल असं वाटण्यासारखं. परंतु काही काही कलाकृतींची लांबी कमी असली तरी त्यांची खोली जबरदस्त असते.

देव चालले ही लघुकादंबरी एका कुटुंबाभोवती फिरते. बहुतेक गावांमध्ये आढळतं त्याप्रमाणे या गावातील एका जोशी कुटुंबातील विद्यमान काळातील बहुतेक कर्ते पुरूष हे आता शहरात स्थायीक झाले आहेत. गावाकडे आता त्यांची केवळ एक वृद्ध काकू राहते. तीच्या सोबतीलाच असल्याप्रमाणे गावातील पिढीजात घरात तीनशे वर्षं जुनी, पिढीजात चालत असलेली नरहरीची मूर्ती आहे. गेल्या कित्येक पीढ्या या देवाची पूजा, उत्सव करत आले आहेत आणि आता गावात त्या कुटुंबातील तरणं माणूस कोणीही राहत नसल्याने देव हलवण्याची वेळ कुटुंबाच्या या पिढीवर येते. त्यासाठी चार भाऊ एकत्र जमतात, वडिल भाऊ देव नेणार हे ठरलेलंच आहे. मात्र आता वास्तू बंद होणार, आता या घरी पुन्हा येणे नाही याची कल्पना असल्याने सगळ्यांच्याच वागणूकीत फरक पडला आहे. केवळ कुटुंबियच नाहीत तर गावातील इतर मंडळीही दुःखी होऊन शेवटच्या आरतीला, पूजेला येत आहेत आणि घरचं कोणीतरी जावं अशा दुःखाची छाया संपूर्ण कुटुंबाबरोबरच त्या प्रसंगाचे साक्षी झालेल्या प्रत्येकाच्याच मनावर पसरली आहे. अनेक प्रकारच्या मानवी भावनांचा, वर्तनांचा आणि परिस्थितीमुळे झालेल्या वर्तणुकीचा ठाव कादंबरीत घेतला गेला आहे. त्यामुळे कादंबरी केवळ ६५ पृष्ठांची असली तरी तिची खोली अफाट आहे.

या कादंबरीमध्ये कमालीची गूढता आहे, मात्र ती रत्नाकर मतकरी किंवा नारायण धारप यांच्या भयकथा- गूढकथा यांच्यापेक्षा खूप वेगळ्या धाटणीची आहे. या कादंबरीतील प्रत्येकाचं वय वेगळं, प्रत्येकाची आर्थिक परिस्थितीही वेगळी. त्यामुळे प्रत्येकाची त्या एकाच प्रसंगात नरहरीशी, गावच्या घराशी असणारी बांधिलकीही वेगळी जाणवते. एकच वातावरण दोन चुलत भावांना वेगळं वाटतं. अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून सर्व भावांमध्ये आलेलं विचित्र दुरावलेपणही अधोरेखित होत जातं. संपूर्ण कादंबरीचं वातावरणच सर्वकाही संपलं आणि आता केवळ निरवानिरव चालू असल्याचा भास निर्माण करणारं आहे. 

पुस्तक वाचून संपवल्यानंतर एकदम त्यावर प्रतिक्रिया देणं अवघड वाटावं अशी कादंबरी आहे. कादंबरी एखादी पटकथा वाचावी इतकी स्पष्ट लिहीली आहे. त्यामुळे वाचताना त्यातल्या व्यक्ती दृग्गोचर होतात. सिनेमा डोळ्यासमोर सरकावा इतक्या सहजपणे त्यांच्या हालचाली, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, मनातले विचार आपण जाणू शकतो. काही बाबत त्यांचा अनुभवही घेऊ शकतो. खरोखरच ज्या पिढीने आपलं बालपण गावात घालवून, तिथले अनुभव कायमच पाठिशी घेतल्यानंतर, त्यांच्यावर आपलं वडिलोपार्जित घर बंद करून, सगळे दोर कापून, देव उचलून दुसरीकडे न्यायची दुर्भाग्यपूर्ण जबाबदारी आली असेल आणि त्यांच्यातल्याही ज्या कोण्या कर्त्या पुरूषाने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी पेलली असेल अशांना ही कादंबरी ही त्यांचीच कथा वाटेल. माझ्यासारख्या मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या व्यक्तीला ही कादंबरी कधीच १०० टक्के जाणवणार नाही.