पुन्हा एकदा सुरुवात...
मागे २०२१-२२ मध्ये एक ब्लॉग सुरू केला होता. पुस्तकं वाचून त्या ब्लॉगवर आपलं मत त्या ब्लॉगवर टाकावं इतक्या माफक हेतूने! आरंभशूरता दाखवून सुरू केला खरा पण पुढे पुस्तक वाचून त्यावर घरच्या डायरीत आणि पुन्हा ब्लॉगवर असं लिहीणं काही झालं नाही, सबब ब्लॉग बंद! मग गेल्या काही महिन्यात स्वतंत्र संकेतस्थळच निर्माण करावं, त्यावर भरपूर लिहावं, पुस्तकांबद्दल लिहावं, गंमत म्हणून कधी नकाशे दाखवावेत असा विविध तऱ्हेने त्याचा वापर करून घ्यावा असा विचार झाला. त्यानुसार आज ६ जून २०२६ रोजी अखेरीस हे संकेतस्थळ अवतरले.
मागच्या ब्लॉगपेक्षा यावेळेस करत असलेला महत्त्वाचा बदल स्वतःत आहे, की लिखाण हे स्वान्तसुखाय आहे. मागे ब्लॉगला व्ह्युज् मिळावेत यासाठी दर आठवड्याला लिहायचा खटाटोप केला मात्र तो चांगलाच आपटला कारण दर आठवड्याला पोस्ट करण्यापूर्वी दर आठवड्याला वाचून त्यावर काही चिंतन करावे लागते. त्यामुळे कोणत्याही माध्यमाचा घे की ढकल हा अंगभूत असलेला दोष त्या ब्लॉगच्याही वाट्याला नसता आला तरच नवल. त्यातून शहाणपण घेऊन यावेळेस निश्चित कालानंतर पोस्ट करायचेच असे न ठरवता जसे वाचून होईल, त्यावर काही चांगले चिंतन- मनन करून चांगले लिहीले जाईल त्यानंतरच पोस्ट करावे हे नक्की! दुसरं असं की, कोणत्याही विषयावर लिहायची मुभा घेतल्याने भू-राजकीय विषयापासून ते एखाद्या कथा कवितेपर्यंत काहीही लिहीलं जाऊ शकतं. त्याबद्दल पुढे सविस्तर लिहीलं आहेच.
संकेतस्थळ अगदीच रिकामे न दिसता लेखांची गर्दी दिसावी म्हणून काही जुन्या पुस्तकांबद्दलच्या लिखाणाने पानं भरून ठेवणार आहे पण ते लिखाण अगदीच गचाळ आहे हे मान्य केले पाहिजे. तेव्हा दुसरा बदल हा की यावेळेस नवीन लिखाण करताना किमान ३०० शब्दांच्या वर लिहावे असा प्रयत्न नक्की करणार आणि प्रयत्न असाही नक्की करणार की पुस्तक जुने असेल, पुनर्प्रकाशित जरी असले तरी माझ्यासाठी संपूर्णपणे नवीन असावे. उदा. पुलंच्या पुस्तकांबाबत आता लिहीण्यात अर्थ नाही कारण त्यांची पुस्तके जवळपास सर्वांनी वाचलीच काय कोळून प्यायली असतील. परंतु जुन्या काळातील इरावती कर्वे किंवा अन्य कोण्या मोठ्या मात्र 'पुलं' इतक्या जनसामान्यांपर्यंत न पोहोचलेले लेखक, किंवा मी अजून न वाचलेले पण जुन्या काळातले लेखक, काही माझे आत्यंतिक आवडीचे विषय अशांबाबत लिहू असा विचार चालू आहे.
आधी म्हटलं त्याप्रमाणे यावेळेस पुलंच्या पुस्तकांपासून ते सुनीताबाईंच्या लिखाणापासून ते अगदी वीज क्षेत्रातील नव्या कायद्यापर्यंत अन्य कोणत्याही विषयावर करावंस वाटणारं लिखाणही सामावून घेणारा स्वतंत्र टॅब या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 'माझा मुक्त संवाद' या टॅबवर मी लिहीलेल्या कथा- कवितेपासून ते भू-राजकीय विषयापर्यंत काय वाट्टेल ते लिहीणार आहे. पुलंनीच माझे पौष्टिक जीवनमध्ये म्हटल्याप्रमाणे पोस्टाच्या पेटीप्रमाणे इथेही काय तरी एखादी कथा आणि त्याच्या शेजारी ट्रम्पने इराणवर केलेल्या हल्ल्याचे परिणाम असाही मजकूर असेल. तेव्हा वाचकांनी बिचकून जाऊ नये म्हणून आधीच सांगितलं. आता संकेतस्थळ चालू झाले आहे. संकेतस्थळावरील काही काम अजून चालू आहे. त्यामुळे काही टॅब्स चक्क रिकाम्या दिसतील. परंतु त्या लवकरच भरल्या जातील यात शंका नसावी. आता प्रवास अधिक लांबपर्यंत होईल अशी आशा करू.
चला तर मग! करूया सुरूवात!!