आहे मनोहर तरी
- सुनीता देशपांडे
या पुस्तकाची सुरूवातच होते ती मुळी, हे आत्मचरित्र नाही या वाक्याने. सुनीताताई म्हणतात त्याप्रमाणे ही आठवणींची सफर आहे. त्यांनी आपल्या विविध स्मृती लिहून त्यांचा जो संग्रह केला आहे ते हे पुस्तक. अर्थातच यात भाईंच्या सहजीवनाच्या देखील अनेक आठवणी दिसून येतात. विविध प्रसंग, घटना यांच्या माध्यमातून गृहस्थाश्रमी पुलंचं दर्शन थोड्याफार प्रमाणात नक्कीच होते. त्या म्हणतात, त्यानुसारच्या त्यांच्या रोखठोक स्वभावाला अनुसरूनच हे लिखाण आहे, असे मला तरी वाटले. भाईंबद्दल देखील लिहीताना कुठल्याही प्रसंगात हात राखून लिहीले आहे असे काह नाही. जिथे भाई चुकले असे सुनीताताईंना वाटते, तिथे तसं स्वच्छपणे लिहीले आहे.
पुलं आणि सुनीताताई यांच्या संबंधांवर काही प्रमाणात प्रकाश टाकणारं हे पुस्तक आहे. एखाद्या कलाकाराच्या पत्नीचं, आपल्या पतीविषयक लिखाण त्या कलाकाराची वेगळी बाजू आपल्यासमोर आणते. खासकरून जेव्हा पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या अतिशय प्रसिद्ध व्यक्तीच्या खासगी आयुष्यात मर्यादित प्रमाणात का होईना पण डोकवायची संधी मिळते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नेक नवे पैलू आपल्यासाठी उलगडले जातात.
(पुस्तकाचा फोटो इंटरनेटवरून साभार)